मुख्य बातमी

जिल्ह्यात ६ लाखांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची मर्यादित मनुष्यबळात धडक कारवाई

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी सात मोठ्या कारवाया करत एकूण ६ लाख ७ हजार १३५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. Lसंबंधित सर्व प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील ही जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) मि. र. महांगडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अन्न सुरक्षा दर्जेदार राहावी यासाठी प्रशासनाने एकूण ६० अन्न आस्थापनांची कसून तपासणी केली आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील १० आस्थापनांचा समावेश असून, प्रामुख्याने बेकरी, हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सची तपासणी करण्यात आली. दापोली तालुक्यातून प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने हे विशेष कामकाज हाती घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील काळातही ही तपासणी सत्र आणि विश्लेषणासाठी अन्न नमुने घेण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.

गिम्हवणे (ता. दापोली) येथील ‘मे. श्री स्टोअर्स’ आणि केळसकर नाका येथील ‘अश्पाक महमुद मनियार’ यांच्या पान शॉपवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला व इतर आरोग्यास घातक असलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे सध्या केवळ चार अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यातही खेड, दापोली आणि मंडणगड या विस्तीर्ण व संवेदनशील क्षेत्रासाठी केवळ एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारी आहे. मात्र, अशा मर्यादित मनुष्यबळाचा सामना करत असतानाही विभागाने जिल्ह्यात ही धडक आणि प्रभावी कामगिरी बजावली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!