पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्ग खचला
आवाशी येथे लाकडाने भरलेला ट्रक उलटला : जीवितहानी नाही, महामार्गावर वाहतूक कोंडी

खेड : गेल्या १४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील आवाशी येथे महामार्गाचा रस्ता तब्बल दीड ते दोन फूट खचल्याने लाकडाने भरलेला एक अवजड ट्रक अचानक उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ही घटना अत्यंत धक्कादायक असून मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
याच ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्याने वाहतूक जुन्याच रस्त्यावरून सुरू होती. पहिल्याच मुसळधार पावसात हा रस्ता खचल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला असून, आणखी अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उलटलेला ट्रक हटविण्याचे काम भर पावसात युद्धपातळीवर सुरू असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, महामार्गाच्या निकृष्ट कामांबाबत संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



