मुख्य बातमी

‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ च्या ‘प्रॅक्टिस रन’चा सोहळा

रत्नागिरी : कोकणातील क्रीडा संस्कृतीला आणि पर्यटनाला चालना देणारा ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ चा प्रॅक्टिस रन आणि सन्मान सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालय येथे आयोजित या सोहळ्यास मुख्य उपस्थिती दर्शवत सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

या सोहळ्यात रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा पालकमंत्री डाॕ सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशी ‘कॉम्रेड स्पर्धा’ पूर्ण केल्याबद्दल अभिजीत पड्याळ व प्रसाद देवस्थळी, सायकलने ‘एव्हरेस्टिंग’ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अथर्व शेंडे, ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पूर्ण केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचा यात समावेश होता.

यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, “मॅरेथॉनमध्ये भाग घेणे ही केवळ एक स्पर्धा नसून, ती एक निरोगी जीवनशैली आहे. आजच्या वाढत्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे. कोकणातील क्रीडा संस्कृती आणि पर्यटनाला उभारी देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.”

स्थानिक खेळाडूंना आणि क्रीडा उपक्रमांना शासनाच्या वतीने नेहमीच सर्वतोपरी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी आगामी मुख्य मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व धावपटू व आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बंड्या साळवी, प्रांताधिकारी जीवन देसाई, रत्नागिरी सायकलिंग क्लबचे महेश सावंत यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात या प्रॅक्टिस रनमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!