मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
भोस्ते घाटात क्रेनचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी सकाळी अवजड क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला; मात्र चालकाने प्रसंगावधान राखत क्रेन थेट दुभाजकावर (डिव्हायडर) चढवल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईकडे निघालेली अवजड क्रेन (क्र. जीए-१५ एसपी-२४) भोस्ते घाटातील तीव्र उतारावर आली असता तिचे ब्रेक अचानक निकामी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने धाडसाने वाहनावरील नियंत्रण राखत क्रेन दुभाजकावर चढवली. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना धडक बसण्याचा धोका टळला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.



