शासकीय तंत्रनिकेतन येथे अभ्यागत अध्यापक पदासाठी ८ जुलै रोजी मुलाखत

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विषम सत्रासाठी विविध अभ्यासक्रमांकरिता तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात अभ्यागत अध्यापक पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. चं. य. सीमिकेरी यांनी दिली आहे.
या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. स्थापत्य (Civil), यंत्र (Mechanical), विद्युत (Electrical), संगणक (Computer), अणुविद्युत (Electronics), मेकॅट्रॉनिक्स (Mechatronics) आणि उपयोजित यंत्रशास्त्र (Applied Mechanics) या अभ्यासक्रमांसाठी बी.ई. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी (M.A. प्रथम श्रेणी), गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यासाठी एम.एससी. (M.Sc.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) विभागासाठी बी.फार्म. (B.Pharm.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील.
उमेदवारांनी आपल्या विषयानुसार संस्थेतील खालील निश्चित केलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुख्य इमारत स्थापत्य, विद्युत, उपयोजित यंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, तसेच विज्ञान व मानव्य शास्त्र विभाग. विस्तारित इमारत संगणक, मेकॅट्रॉनिक्स, यंत्र आणि अणुविद्युत विभाग.
ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात तासिका पद्धतीने असेल. इच्छुकांनी मुलाखतीला येताना आपला अर्ज, सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींचा संच सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



