मुख्य बातमी

पटवर्धन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश

पाचवी व आठवीचे तब्बल १२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित, पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत उत्तुंग झेप घेत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये मिळून शाळेतील तब्बल १२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून पटवर्धन हायस्कूलचा नावलौकिक अखंड राखला आहे.

इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये शौनक अमेय गोखले (जिल्ह्यात १३ वा), रुद्र संदेश जोशी (जिल्ह्यात २३ वा), आकाश धनंजय कुलकर्णी (जिल्ह्यात ५५ वा), स्मित मंगेश कदम (जिल्ह्यात ९५ वा) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मराठी विषयासाठी श्री. मोहिते व श्रीमती पवार, गणित विषयासाठी श्रीमती शेट्ये व श्री. कनोजे तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी श्री. धामापूरकर व श्रीमती अहिरे, इंग्रजी विषयासाठी श्री. भोये व श्रीमती काटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पटवर्धन हायस्कूलच्या तब्बल ८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गुणवत्ता यादीत मार्तंड नरेंद्र गावंड (जिल्ह्यात ४ था), आर्या नितिन पळसुलेदेसाई (जिल्ह्यात १४ वी), अनुष्का धनंजय कुलकर्णी (जिल्ह्यात २८ वी), श्रुती संतोष सावंत (जिल्ह्यात ३० वी), समृद्धी शैलेश शिरगावकर (जिल्ह्यात ३१ वी), जय राजेंद्र रांगणकर (जिल्ह्यात ५४ वा), विदुला जितेंद्र मुळ्ये (जिल्ह्यात ६८ वी), अर्णव संदेश शहाणे (जिल्ह्यात ८५ वा) यांनी स्थान पटकावले.

या विद्यार्थ्यांना मराठीसाठी श्री. पालकर व श्रीमती केळकर, गणितासाठी श्रीमती दामले व श्रीमती बंडबे, बुद्धिमत्तेसाठी श्रीमती विलणकर आणि इंग्रजी विषयासाठी श्री. भोये व श्रीमती डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर, पर्यवेक्षिका श्रीमती शिरोळकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांना खंबीर साथ देणाऱ्या पालकांचे आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!