मुख्य बातमी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये’ या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये (Life Skills for Professional Development)” या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मत्स्य महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये १५ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. संदीप करे, मत्स्य महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दबीर पठाण आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ रोटेरियन दादा कदम उपस्थित होते.

डॉ. करे यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलन या जीवन कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून बदलत्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवाद आणि सातत्याने कौशल्यवृद्धी यांवर भर देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जीवन कौशल्ये ही वैयक्तिक प्रगती आणि व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांचा विकास करून समाजासाठी जबाबदार आणि सक्षम नागरिक बनण्याचे आवाहनही केले.

या कार्यक्रमास मत्स्य महाविद्यालय व मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. ८५ विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान विविध प्रश्न विचारून संवाद साधला व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

आभारप्रदर्शन डॉ. चौधरी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या वृद्धीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजन मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश पाटील, डॉ सुशील कांबळे आणि डॉ. राकेश जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!