सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात केले दाखल; आंदोलनस्थळी मोठा गोंधळ

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्याने याठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे समजते आहे.
सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या इतर आंदोलकांना आणि समर्थकांनाही पोलिसांनी तिथून हटवण्यास सुरुवात केली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी वांगचुक हे दिल्लीत मोठे आंदोलन करत आहेत. वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यामुळे आता या आंदोलनाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वांगचुक यांनी जंतरमंतरवर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठींबा वाढत होता. राजकीय पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला होता. अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेसचे नेते देखील वांगचुक यांना भेटायला जंतरमंतर येथे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी देखील वांगचुक यांना फोन करत पाठींबा दिला होता. तसेच २० जुलैला ते दिल्लीत जात वांगचुक यांची भेट घेणार होते.
सोनम वांगचूक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरातून सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. नीट पेपर फुटीवरून सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, राजकीय पातळीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती. दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, कोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीच्या हायकोर्टात सोनम वांगचूक यांच्या तब्येतीवरून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं होतं की, सरकारी डॉक्टरांनी सोनम वांगचूक यांची नियमितपणे तपासणी करावी. तसेच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, आवश्यक ती पावले उचलावीत, जीवन अनमोल आहे, असे कोर्टाने नमूद केले होते.



