मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध; तब्बल ४११ हरकती दाखल

गुहागर : नगरपंचायतीने नव्याने सादर केलेल्या विकास आराखड्याला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, आराखड्याविरोधात तब्बल ४११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर २३ आणि २४ जुलै रोजी सुनावणी होणार असून, संबंधित नागरिकांना नगरपंचायतीकडून नोटिसा पाठविण्यात येत आहेत.

गुहागर नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला सुरुवातीपासूनच शहरवासीयांचा विरोध होत आहे. यापूर्वी आराखड्यावर सुमारे १,५०० हून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही मोजके बदल करून मार्च महिन्यात सुधारित विकास आराखडा पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, या सुधारित आराखड्यावरही नागरिकांनी समाधान व्यक्त केले नसून पुन्हा मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल केल्या आहेत. नागरिकांच्या मते, प्रस्तावित १८ मीटर रुंदीचा रस्ता ९ मीटरवर आणण्यात आला असून, अनेक ठिकाणी आरक्षणे चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहेत.

तसेच ज्या भागात विकासासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, तेथे हरितपट्टा प्रस्तावित करण्यात आल्याने शहराच्या भविष्यातील विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांनी कोकण विभागाचे सहसंचालक श्रीकांत देशमुख यांची भेट घेऊन विकास आराखड्याबाबतच्या हरकती मांडल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दाखल झालेल्या सर्व ४११ हरकतींवर २३ व २४ जुलै रोजी गुहागर येथे सुनावणी होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!