मुलगा-मुलगी एकसमान कृतीत आणणे महत्त्वाचे : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पीसीपीएनडीटी कायद्याबाबत चर्चासत्र
रत्नागिरी : मुलगा मुलगी एकसमान ही भावना, हे विचार बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत आणणे महत्त्वाचे आहे. आजही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मुलींच्या प्रमाणात तफावत आढळते. गर्भलिंग निदान करणे हे बेकायदेशीर आहे. याची जनजागृती, प्रचार प्रसिध्दी समाजातील घटक म्हणून आपण सर्वांनी करणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असे मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पीसीपीएनडीटी कायदा १९९४ च्या संदर्भात आज चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई, समुपदेशक योगिता पावसकर आदी उपस्थित होते.
सचिव श्री. पाटील यांनी प्रास्ताविकेत पीसीपीएनडीटी १९९४ च्या कायद्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चर्चासत्र घेत असल्याचे सांगितले. आजही समाजाच्या पुढारलेल्या वर्गात मुलगा हाच वंशाच्या दिवा ही असणारी भावना कुठेतरी संपविण्याची गरज आहे. त्यासाठी विधी स्वयंसेवकाच्या माध्यमातून या कायद्याची जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. शिंदे यांनी गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा याबाबत माहिती दिली. कोणत्याही रुग्णालयात गर्भलिंग निदान करता येत नाही. त्यासंदर्भात फलक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. शिवाय सोनोग्राफीसाठी नोंदणी परवानगी लागते. रत्नागिरीमध्ये मुलींचे प्रमाण हे हजारी ११२२ आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र हे प्रमाण कमी असल्याचे त्या म्हणाल्या.
ॲड. पावसकर यांनी या कायद्याची सविस्तर माहिती दिली. कायद्याची उद्दिष्ट्ये गुन्ह्यामधील तरतूद, जिल्हास्तरीय सल्लागार समितीची कार्यवाही याचा समावेश होता. त्या म्हणाल्या १८००२३३४४७५ हा टोल फ्री क्रमांक आहे. www.amachimulgi.gov.in या संकेतस्थळावर काही तक्रारी असल्यास त्या दाखल कराव्यात. प्रत्येक रुग्णालयात इंग्रजी आणि स्थानिक भाषेत फलक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षाचा कारावास, दहा हजार रुपये दंड पुन्हा हाच गुन्हा केल्यास पाच वर्ष शिक्षा व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. नैसर्गिक समतोल ढासळू नये तो राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी, असेही त्या म्हणाल्या.
या चर्चासत्रासाठी अंगणवाडी सेविका, विधी स्वयंसेवक, वकील आदी उपस्थित होते.


