ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चे रत्नागिरी विभागाचे जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जावकर प्लाझा, जयस्तंभ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा उद्घाटन सोहळा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे तसेच पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, सचिन गोताड, साहिल गोरे, दीपक सांबरे, बंटी महाकाळ, कैलास आडवीरकर, राज फुटक, मंदार मांडवकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास उर्फ बंधू वारीशे, पाऊस जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, पावस विभाग समन्वयक अजय तेंडुलकर, निलेश गजने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने हजर होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी ॲड. मांडवकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच “या कार्यालयात जनतेच्या प्रश्नांसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यासोबत आम्ही देखील खांद्याला खांदा लावून काम करू असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.
या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जाती, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांसाठी अर्ज करणे, अर्जांचा पाठपुरावा करणे आणि जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांचे मार्गदर्शन या सर्व सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत.
खेड्यापाड्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात होणारा त्रास कमी व्हावा, हाच या कार्यालयामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी यावेळी सांगितले.



