एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : राज्यात राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे मुख्य लाभ व घटक : फळबाग व रोपवाटिका- रोपवाटिका स्थापन करणे, क्षेत्र विस्तार, तसेच स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, अव्हेकॅडो, अननस, पपई यांसारख्या फळ पिकांची लागवड.
विशेष शेती व उत्पादन- अळंबी (मशरूम) उत्पादन प्रकल्प, पुष्पोत्पादन, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड आणि मधुमक्षिका पालन.
पाणी व संरक्षित शेती- सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, हरितगृह (ग्रीनहाऊस) व शेडनेटगृह उभारणी.
आधुनिक तंत्रज्ञान व साहित्य- प्लास्टिक मल्चिंग, फळांच्या घडांचे कव्हर, तण नियंत्रक आच्छादन.
कृषी यांत्रिकीकरण व काढणीपश्चात व्यवस्थापन- ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पीक संरक्षण उपकरणे, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन (रेफर व्हॅन), प्राथमिक प्रक्रिया केंद्र आणि रायपनिंग चेंबर.
इच्छुक शेतकरी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन किंवा थेट महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर ([https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin](https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin)) जाऊन ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात.
विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी योजनांच्या सविस्तर माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी आपल्या गावपातळीवरील कृषी सहाय्यक, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



