बहीण-भावाचे पवित्र नाते जपणारा सण रक्षाबंधन

“सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा, सण हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा, सण हा रक्षाबंधनाचा”.
भारतीय संस्कृती ही जगात उच्च व पवित्र संस्कृती मानली जाते. आजही आपण आपल्या संस्कृतीतील सण परंपरेने साजरे करत असतो. भारतीय संस्कृतीत सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीच्या स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणांची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे.
उत्तर भारतात कोजागिरी पौर्णिमा पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा केला जातो. हा सण बहीण- भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या रक्षाबंधन मागची मंगल मनोकामना आहे. राखी बंधनाच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगित करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
रक्षाबंधन हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी बनलेला आहे. संस्कृत भाषेनुसार या उत्सवाचा अर्थ संरक्षण करणारे बंधन असा आहे. रक्षाबंधनाच्या दिनी हाती राखी मी बांधील भाऊ माझा कृष्णवानी माझे करील रक्षण अशा प्रकारे भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ बहिणीचे प्रेम दर्शविते.
आख्यायिका
पूर्वी देव दानवांच्या युद्धात शक्तीपुढे देवीचे काही चालत नसे. दानवांचा राजा रुत्रासुरव याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले, तेव्हा इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या दिवशी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी सूची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधले. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी त्याची श्रद्धा होती. त्याप्रमाणे इंद्राचा विजय झाला आणि गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली.
स्त्रियांकडे वाईट नजरेने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा, असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या रक्षाबंधन सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे त्याला आणखी विस्तृत स्वरूप देणे गरजेचे आहे.
– चंद्रशेखर अनंत पेटकर (8805490671)



