चिपळूणजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी

चिपळूण : तालुक्यातील आंबडस-खांदाट परिसरात काल (२९ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात १८ प्रवाशांसह दोन्ही बसचालक आणि एका वाहकासह एकूण २१ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ एका वळणावर समोरासमोर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसमधील प्रवाशांना दुखापत झाली.
तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि यंत्रणांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश करून एकूण २१ जण जखमी झाले.



