ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा राजीनामा
वयोमानानुसार युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही नाराजीचा उल्लेख न करता केवळ वय आणि युवा नेतृत्वाला संधी हे कारण त्यांनी नमूद केले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी, राजापूर-लांजा आणि चिपळूण-संगमेश्वर या तीन विधानसभा क्षेत्रासाठी प्रसाद सावंत यांची जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्याआधी त्यांनी दोनदा युवासेना तालुकाप्रमुख आणि नंतर रत्नागिरी शहर संघटक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. युवासेनेच्या सुरुवातीच्या काळापासून निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
गेले कित्येक महिने रिक्त असलेले जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तिन्ही विधानसभा क्षेत्रात दौरा करून संघटनेचा आढावा घेतला होता आणि युवासैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते.
प्रसाद सावंत यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, वयोमानानुसार युवासेनेतील पद हे खऱ्या अर्थाने युवा कार्यकर्त्याकडे असावे. त्यामुळे आपण स्वतःहून ही जबाबदारी सोडत असून पक्षाने एखाद्या तरुण, तडफदार कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
पद सोडले असले तरी शिवसेना संघटना वाढीसाठी आपले प्रयत्न थांबणार नाहीत, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचे काम एक सामान्य शिवसैनिक म्हणून करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कॉलेज उपाध्यक्ष, शिवसेना उपविभाग प्रमुख, दोनवेळा युवा तालुकाप्रमुख, शिवसेना शहर संघटक आणि युवासेना जिल्हाप्रमुख अशी विविध पदं भूषाविताना त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. युवासेनेच्या जडण घडणीत त्यांचा मोठा हात आहे. युवक वर्गात लोकप्रिय आणि युवकांचा मोठा पाठिंबा असणारा चेहरा म्हणून प्रसाद सावंत यांची ओळख आहे. बेधडक आणि निडरपणे भिडणारा युवाप्रतिनिधी म्हणून प्रसाद सावंत यांच्याकडे पाहिले जाते.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडच्या काळात युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद सावंत यांचा हा राजीनामा वेगळा मानला जात आहे. त्यांनी कोणत्याही नाराजीचा उल्लेख न करता केवळ वय आणि युवा नेतृत्वाला संधी हे कारण दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे पक्षात कौतुक होत आहे.

