मुख्य बातमी

श्रावण महोत्सवानिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठेचे ५ सप्टेंबरपासून आयोजन

रत्नागिरी : उद्योगिनी महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सवानिमित्त भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर ते मंगळवार, ८ सप्टेंबर या कालावधीत माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी आहे.

या प्रदर्शनात विविध घरगुती उत्पादने, कोकण मेवा, खाद्यपदार्थ, तत्काळ खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने, विविध ब्रँडेड वस्तू, लिनन, सिल्क व कॉटन साड्यांचे विविध प्रकार, सौंदर्य प्रसाधने, कुर्ती, ज्वेलरी, हस्तकला उत्पादने, ड्रेस मटेरियल्स, गाऊन्स, पर्सेस, साड्या आदी वस्तू उपलब्ध असणार आहेत. तसेच विविध प्रकारच्या ब्रँडेड अगरबत्ती किरकोळ व घाऊक दरात उपलब्ध होणार असून, गणपतीसाठी आवश्यक पूजा व सजावटीचे साहित्य, विविध खाद्यपदार्थ, केक, हॉट डॉग, बर्गर, फ्रेंच फ्राइज आदी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.

महिलांसाठी प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता उद्घाटन समारंभ होईल. सायंकाळी ८ वाजता प्रश्नमंजुषा व विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता फेस्टिव्हल मेकअप व स्वतःचा मेकअप करण्याचे प्रात्यक्षिक होणार असून, सायंकाळी ८.३० वाजता आदर्श वसाहत, कारवांचीवाडी येथील गौरीई ग्रुपतर्फे मंगळागौरी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता विपश्यनासंबंधित आनापान प्रात्यक्षिक व माहिती देण्यात येणार आहे. यावेळी विपश्यना सेंटरच्या ट्रस्टी सौ. युगंधरा राजशिर्के मार्गदर्शन करणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता लायन्स क्लब रत्नागिरी इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रदर्शनातील सर्व स्टॉल्समधून दोन आदर्श स्टॉल्सची निवड लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे करण्यात येणार आहे.

रत्नागिरी शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी प्राची शिंदे यांच्याशी ९४२२३७६२२४ किंवा ९७६४४१७०७९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!