मुख्य बातमीशैक्षणिक

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : येथील खातू नाट्यगृहामध्ये २९ मार्च रोजी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि पालक सभा झाली. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक सभा एक उत्तम मंच आहे की ज्यात शिक्षक विद्यार्थी पालक आणि प्रशासन यांच्यात एक उत्तम संवाद प्रस्थापित होतो. इयत्ता बारावीच्या दृष्टीने वर्षभराच्या नियोजनाची माहिती पालकांना मिळावी व पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम, रत्नागिरी पॅटर्नच्या नियोजनाबद्दलची माहिती, विविध सराव परीक्षा संदर्भातील नियोजन, स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, रेमिडियल विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना अशा विविध उद्दिष्टांची पालकांना माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५- २६ च्या सुरुवातीलाच ही सभा आयोजित केली गेली.

या सभेला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश शेवडे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम कटिबद्ध आहे. संस्था नेहमी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वेळोवेळी काही बदल करत असते. यामध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद विशिष्ट ॲपद्वारे घेतली जाईल व त्याचा मेसेज पालकांच्या मोबाईलवर येईल की जेणेकरून आपला पाल्य कॉलेजमध्ये उपस्थित आहे की नाही हे अवगत करता येईल. याबरोबरच चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयाने विद्यार्थी शिस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केला जाईल. या बदलांना पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्याबरोबर पालकांची सुद्धा एक परीक्षाच असते त्यासाठी आपली भूमिका पार पाडण्यासाठी महाविद्यालय नेहमी सहकार्य करेल.”

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयांमध्ये राबवलेल्या उपक्रमाबद्दल पालकांना माहिती दिली. मागील वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध स्पर्धांमधील यश, कोकण बोर्डमध्ये मिळवलेले प्राविण्य व क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश याबाबतची माहिती दिली आणि पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा केली.

या पालक सभेचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी केले. यामध्ये त्यांनी आपला पाल्य प्रवेश घेतल्यापासून ते महाविद्यालयातून प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडेपर्यंत पालक म्हणून आपली भूमिका काय असावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. पालकांना आपला विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त कसा उपस्थित राहील व सर्व विषयांचे प्रकल्प, प्रात्यक्षिके वेळेत कसे पूर्ण करून घेता येईल याबद्दल सूक्ष्म नियोजन कसे करता येईल व विद्यार्थ्यांना पालक म्हणून आपली कशी मदत होईल याविषयीचे हे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात त्याचे निराकरण वेळीच करणे गरजेचे असते त्यांच्या शालेय कामकाजावर लक्ष ठेवण्याचे त्यांना योग्य संधी देण्याचीही गरज असते असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मत व्यक्त केले.

या सभेसाठी संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, आजीव सभासद मंडळ सचिव प्रा. महेश नाईक, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर, कला शाखाप्रमुख प्रा. वैभव कानिटकर तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. तसेच पालक सभेला हजारो पालकांची उपस्थिती लाभली. या पालक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. विद्याधर केळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!