रा. भा. शिर्के प्रशालेत ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ताच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्वयंशासन दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार, पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे आणि सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. परिपाठ इयत्ता दहावीमधील छात्र शिक्षकांनी सादर केला. या स्वयंशासन दिनाचे छात्र मुख्याध्यापक आदिती सावंत, तर छात्र उपमुख्याध्यापक संकेत पवार, पर्यवेक्षक आरुणी दुधाळे आणि सेवक म्हणून संघराज जाधव आणि राज पालकर यांनी जबाबदारी सांभाळली. परिपाठामध्ये गौरेश कोकरे या विद्यार्थ्याने बातम्या सांगितल्या. अत्रेय देवस्थळी याने कथा सांगितली. पार्थी मेहेंदळे या विद्यार्थिनीने पंचांग सांगितले. छात्र मुख्याध्यापिका आदिती सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी आर्मी लेफ्टनंट अनिकेत वाडकर यांची ओळख करून दिली. तसेच स्वयंशासन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, छात्र शिक्षकांना प्रोत्साहन, सूचना आणि शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि आर्मीमध्ये लेफ्टनंट या पदावर रुजू झालेले अनिकेत वाडकर यांनी प्रशालेला भेट दिली. त्यांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात संरक्षण क्षेत्रात कसे जावे यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले आणि एनसीसी विभागातील माजी शिक्षक श्री. पाटील आणि श्री. गद्रे यांचे आभार मानले आणि आजच्या छात्र शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए. पी. चव्हाण यांनी ‘सागरमित्र’ या उपक्रमासंदर्भातील प्लास्टिकचा पुनर्वापर याबद्दल माहिती दिली.
यानंतर प्रत्यक्ष शालेय तासिकांना सुरुवात झाली. नियोजनाप्रमाणे सर्व छात्र शिक्षकांनी आपल्याला आलेले तास विविध वर्गामध्ये जाऊन अगदी वेळेत घेतले आणि या सर्व छात्र शिक्षकांच्या तासाचे नियमित शिक्षकांनी परीक्षण केले.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये छात्र शिक्षक म्हणून अथर्व खापरे आणि मीनाक्षी पवार यांनी शिक्षकाची जबाबदारी पूर्ण करताना आलेले अनुभव सर्व विद्यार्थ्यांसमोर कथन केले. इयत्ता आठवी मधील खुशी केळकर या विद्यार्थिनीने आपल्याला आज लाभलेले छात्र शिक्षक यांनी कसे शिकवले याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. आयरे यांनी आपल्या मनोगतातून परीक्षण केलेल्या छात्र शिक्षकांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांचे आचरण कसे असावे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने छात्र शिक्षकांमधून आदर्श शिक्षिका म्हणून रिद्धी लिंगायत, तर आदर्श शिक्षक म्हणून समीर कुवर आणि राज जाधव यांना विभागून देण्यात आले. तसेच सेवक म्हणून जबाबदारी सांभाळणारे संघराज जाधव आणि राज पालकर या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. हे बक्षीस प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. पवार व माजी शिक्षिका सौ. घैसास यांच्याकडून देण्यात आले.
छात्र शिक्षकांचे पाठ पाहण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रशालेचे माजी शिक्षक श्री. सोहनी आणि श्री. देवळेकर उपस्थित राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार यांनी सर्व छात्र शिक्षक यांचे कौतुक केले आणि शिक्षकांची भूमिका सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनीही भविष्यात शिक्षक बनले पाहिजे, असे त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र शिक्षिका श्रेया वाडकर या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन पार्थी मेहेंदळे या विद्यार्थिनीने मांडले.



