मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सुरू 

लोकचळवळ म्हणून अभियान राबवा : मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर गावागावांतील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या अभियानाची संकल्पना असून या दरम्यान गावोगावी अस्वच्छ व अडचणीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा-महाविद्यालयांतील स्वच्छता ज्ञानयात्रा, सफाईमित्र व स्वच्छता कामगारांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाबाबत घरोघरी जनजागृती तसेच ‘वेस्ट टू वेल्थ’ व ‘वेस्ट टू आर्ट’ यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. सरपंच, सचिव आणि उपसरपंच यांनी आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रात नियोजनबद्ध कृती आराखडा राबवून गावाचे नेतृत्व करावे. लोकांना या अभियानात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, स्वच्छाग्रही व स्वच्छता दूतांनी घराघरांत पोहोचून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.

शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळांमधून स्वच्छता ज्ञानयात्रा व जनजागृती फेऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व युवक मंडळांनी श्रमदान व स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, धर्मगुरु व आध्यात्मिक नेत्यांनी आपल्या प्रवचनांतून, सत्संगांतून स्वच्छतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सेवा आहे. गावातील प्रत्येक हात या कार्यात जोडला गेला, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांनी केले. तसेच सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना अभियानाचे दैनंदिन अहवाल व छायाचित्रे विहित पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत कराव्या, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनीही सर्व गटविकास अधिकारी व यंत्रणांना अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!