जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजाचा दुहेरी सुवर्णवेध
दीपराज खानविलकर व तीर्था यादव यांची सुवर्णपदकावर मोहोर : कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

लांजा : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दीपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी दमदार कामगिरी करत आपल्या-आपल्या गटात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती, राजापूर संचलित राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना तसेच तायक्वॉंदो अकॅडमी, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत लांजा तालुक्यातून एकूण ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यापैकी दिपराज खानविलकर आणि तीर्था यादव यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
दीपराज खानविलकर हा न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, लांजा येथे इयत्ता ११वीमध्ये शिक्षण घेत असून, तीर्था यादव ही डी. जे. सामंत स्कूल, लांजा येथे शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणासोबतच तायक्वॉंदोच्या सरावासाठी सातत्याने मेहनत घेत या दोन्ही खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील राष्ट्रीय पंच शितल विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.
दरम्यान, जिल्हास्तरीय स्पर्धेतील या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दीपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांची १ व २ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर विभागात होणाऱ्या शालेय तायक्वॉंदो विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता विभागीय स्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या दोन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना मिळणार आहे.
या यशाबद्दल तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी, लांजा, गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी, लांजा तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दीपराज खानविलकर व तीर्था यादव यांचे अभिनंदन करण्यात आले.
अकॅडमीचे अध्यक्ष श्री. किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सचिव व राष्ट्रीय पंच तथा प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे व सदस्य लक्ष्मण कररा यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.
तसेच अकॅडमीचे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच तेजस पावसकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर आणि स्वरूप शिंदे, क्रीडा शिक्षक तसेच समस्त लांजावासीयांनी दीपराज खानविलकर व तीर्था यादव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

