रत्नागिरीत विभागीय वूशु स्पर्धेचे आयोजन
पाच जिल्ह्यांतील ९० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, जिल्हा क्रीडा परिषद आणि रत्नागिरी जिल्हा वूशु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ च्या कोल्हापूर विभागीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे या स्पर्धा पार पडत आहेत.
या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि यजमान रत्नागिरी अशा एकूण पाच जिल्ह्यांमधील सुमारे ९० हून अधिक खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा एकूण १० वजनी गटांमध्ये आणि १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटांत घेतली जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या विविध वजनी गटांतील सामने पार पडत असून, दुसऱ्या दिवशी मुलींच्या गटातील सामने रंगणार आहेत.
स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक तसेच पालकांचे रत्नागिरीत सहर्ष स्वागत करण्यात आले. या विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू राज्यस्तरीय शालेय वूशु स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी दिली.



