ज्येष्ठ रंगकर्मी नंदू पाटील शनिवारी ओरोसला रसिकांशी साधणार संवाद

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबर महिन्याच्या कार्यक्रमात उद्या (२६ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ अभिनेते आणि प्रख्यात रंगकर्मी, पर्यावरण, समतावादी चळवळीतील कार्यकर्ते नंदकुमार उर्फ नंदु पाटील रसिकांशी संवाद साधणार आहेत. ओरोस खर्येवाडी (जैतापकर कॉलनी) येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाचा हा एकोणिसावा मासिक कार्यक्रम आहे. नंदकुमार उर्फ नंदु पाटील यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. श्री. पाटील यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी आहे. नाटक, चित्रपट, मराठी, हिंदी सामाजिक आणि ऐतिहासिक मालिका, वेब सिरीज, जाहिराती अशा अनेक रंगमंचांवर त्यांचा सहज वावर असतो. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ते चोखंदळ आणि रसिक वाचक आहेत. पुरोगामी विचारांचे पाईक असलेले श्री. पाटील पर्यावरण, निसर्ग संवर्धन, समतावादी चळवळीत सातत्याने सहभागी होतात. यामुळे त्यांचे अनुभवविश्व अत्यंत समृद्ध झाले आहे. या कार्यक्रमात ते आपले वैविध्यपूर्ण अनुभव रसिकांसोबत शेयर करतील. गेली ३७ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील मोरोपंत पिंगळे ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
या कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुलाला असून, कुटुंबीय, परिवार, मित्रमंडळी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.


