गावखडीत बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप

गावखडी : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करीत बारा दिवसांच्या गणरायाला अनंत चतुर्दशीदिवशी गणेशभक्तांनी भक्तिमय वातावरणात गावखडी येथील समुद्र किनारी निरोप दिला.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात पण भाद्रपद महिन्यात श्री गणेश चतुर्थीला मात्र श्री गणेशाची घरोघरी भाविक प्राणप्रतिष्ठापना करतात. आज बारा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या… एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. आज पावसाने उघडीप दिल्याने गणेश विसर्जनाला अडचण आली नाही. गावखडीत समुद्रकिनाऱ्यावर गणरायाला पीक-पाणी चांगलं होऊ देत, सर्वांना सुखी ठेव असे साकडे भक्तांनी घातले.



