मुख्य बातमी

रत्नागिरीत श्री दुर्गा सप्तशतीचे सामूहिक पठण संपन्न; राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त शक्ति स्मरण

रत्नागिरी : देश-विदेशात महिलांचे सशक्त संघटन करणाऱ्या ‘राष्ट्र सेविका समिती’ला विजयादशमी २०२६ ला ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने रत्नागिरीत नारायणी पठण मंडळ, स्वानंद पठण मंडळ आणि रेणुका प्रतिष्ठानच्या साधकांनी आश्विन शुद्ध तृतीया १३ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गा सप्तशतीचा भव्य सामूहिक पाठ संपन्न केला.

कार्यक्रमाचा प्रारंभ भारतमाता, रेणुकामाता आणि देवी अष्टभुजा यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. राष्ट्र सेविका समितीच्या दक्षिण रत्नागिरी सेवा प्रमुख डॉ. सौ. रंजना केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सेविकांनी या पाठाचे नेटके नियोजन केले, तर सौ. विशाखा भिडे यांनी पाठासाठी विशेष मार्गदर्शन केले.

मंत्रयोग साधनेमुळे वातावरण शुद्धी, उच्चार शुद्धी आणि मनःशक्तीचे जागरण होते; तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन विश्वाच्या कल्याणासाठी सुमंगल चिंतन घडते, या भावनेतून १०० हून अधिक महिलांनी या सामूहिक पाठात सहभाग नोंदवला. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकर्त्या कल्पना आठल्ये, राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका विद्या पटवर्धन तसेच ज्येष्ठ साधक अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांना नियमित मार्गदर्शन करून पठण शिकवणाऱ्या आणि अनेक कुटुंबांना सकारात्मक विचारांशी जोडणाऱ्या नारायणी मंडळाच्या सौ. विशाखा भिडे, स्वानंद पठण मंडळाच्या सौ. अश्विनी जोशी तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या मंत्रयोग उपक्रम प्रमुख सौ. योजना घाणेकर यांचा या वेळी विशेष गौरव व कौतुक करण्यात आले.

अतिशय पवित्र, प्रसन्न आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया केळकर यांनी केले. रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव मानसी डिंगणकर यांच्या ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!