मुख्य बातमी

‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आणि नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न

लेखिकांच्या साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार : सलग तिसऱ्या वर्षी दिवाळी अंकाचे प्रकाशन

रत्नागिरी : ‘आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग’ यांच्या वतीने ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आणि नवरात्रोत्सव पंडित अ. के. देसाई हायस्कूल येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे हे तिसरे वर्ष असून, या उपक्रमातून कोकण विभागातील लेखिकांच्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

‘माणिकमोती’ हा दिवाळी अंक म्हणजे लेखिकांच्या सर्जनशीलतेचा आणि कलात्मक अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार आहे. या अंकामध्ये सदस्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, लेख, प्रवासवर्णने, कवितांचे रसग्रहण, त्यांनी साकारलेल्या कलाकृतींची छायाचित्रे तसेच विविध पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. साहित्य, कला आणि संस्कृती यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या अंकातून लेखिकांच्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन घडते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. शाळेच्या निवृत्त शिक्षिका, लेखिका आणि कवयित्री सौ. समिधा बाष्टे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली, तर कोकण विभागप्रमुख सौ. सुनेत्रा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. तांत्रिक विभागप्रमुख सौ. उमा जोशी यांनी ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. समिधा बाष्टे म्हणाल्या, “मोबाईलच्या जमान्यातही लेखन आणि वाचनात सातत्य राखून सलग तीन वर्षे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.” त्यांनी संस्थेच्या या साहित्यिक उपक्रमाचे विशेष कौतुक करून लेखिकांच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

दिवाळी अंकाच्या प्रकाशनासोबतच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून देवी आणि नवरात्र या विषयांवर आधारित कविता, गीते तसेच गोंधळाचे सादरीकरण करण्यात आले. सदस्यांच्या कलाविष्कारामुळे कार्यक्रमाला साहित्यिक आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. साहित्याची आवड जोपासतानाच परंपरा आणि संस्कृती यांचे जतन करण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या प्रसंगी कोकण विभागप्रमुख सौ. सुनेत्रा जोशी, कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुलकर्णी, तांत्रिक विभागप्रमुख सौ. उमा जोशी, अर्चना देवधर, कुंदा बापट, राधिका आठल्ये, उमा देवळे, लता जोशी, शमा प्रभुदेसाई, विशाखा पाटोळे, मनीषा पटवर्धन, गौरी थत्ते, चित्रा गोस्वामी आणि डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्यासह संस्थेच्या सदस्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पाटोळे यांनी केले, तर उमा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी साबुदाणा वडा, चटणी आणि चहाच्या अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

साहित्य, कला आणि संस्कृती यांचा संगम साधणारा ‘माणिकमोती’चा हा उपक्रम कोकणातील लेखिकांच्या लेखनप्रवासाला नवी प्रेरणा देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!