मुख्य बातमी

जिल्ह्यात आर्थिक समावेशन योजनांच्या संतृप्ततेसाठी विशेष मोहीम; ग्रामस्थांनी शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर आर्थिक समावेशन योजनांच्या संतृप्ततेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये विशेष बँकिंग शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले आहे.

ही मोहीम जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली राबविली जात असून, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (LDM) हे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून या मोहिमेचे समन्वय साधत आहेत. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व बँका, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. पात्र नागरिकांना बँकिंग सेवा, सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर आर्थिक सुविधांचा थेट लाभ मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

मोहिमेअंतर्गत राबविले जाणारे प्रमुख उपक्रम व सेवा:

* नवीन बँक खाती उघडणे: प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत बँक खाते नसलेल्या सर्व पात्र प्रौढ नागरिकांची, तसेच विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहातील (PVTG) कुटुंबांची खाती उघडण्यात येतील.

* सामाजिक सुरक्षा व विमा योजना: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत नागरिकांची नोंदणी करून विमा संरक्षण दिले जाईल.

* Re-KYC व नामनिर्देशन (Nomination): प्रलंबित बँक खात्यांचे ‘पुनः-केवायसी’ (Re-KYC) पूर्ण करणे तसेच खात्यांमध्ये वारसदार/नामनिर्देशन अद्ययावत केले जाईल.

* बंद/निष्क्रिय खाती सुरू करणे: बऱ्याच काळापासून निष्क्रिय (Inoperative/Dormant) असलेली खाती पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल.

* दावा न केलेल्या ठेवी (Unclaimed Deposits): ‘आपकी पूंजी, आपका अधिकार’ या उपक्रमांतर्गत दावा न केलेल्या बँक ठेवी व इतर वित्तीय मालमत्ता मिळवून घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.

* शेतकऱ्यांसाठी सुविधा: किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज संकलित करणे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) बाबत मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रिया राबविली जाईल.

* सायबर सुरक्षा जनजागृती: डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक, डिजिटल अरेस्ट, OTP व PIN ची गोपनीयता आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली जाईल.

या मोहिमेचा लाभ बँक खाते नसलेले नागरिक, शेतकरी बांधव, पीएम-किसान लाभार्थी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि लहान व्यावसायिकांनी आवर्जून घ्यावा. ग्रामस्थांनी आपापल्या संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून शिबिराची तारीख व वेळ जाणून घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह शिबिरामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!