रत्नागिरी जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा पथकाची संगमेश्वर तालुक्यातील थीबा एग्रोच्या मत्स्य प्रकल्पाला भेट
मत्स्यपालनासह अॅक्वापोनिक्स शेतीच्या आर्थिक फायद्यांवर भर

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उमरे (ता. संगमेश्वर) येथे उभारलेल्या बायोफ्लॉक मत्स्यपालन प्रकल्पाची जिल्हा कृषी विभागांतर्गत आत्मा विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
उमरे येथील थीबा एग्रो शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांनी हा मत्स्यपालन प्रकल्प उभारला आहे. महिलांनी एकत्रित प्रयत्नांतून उभ्या केलेल्या या प्रकल्पाची दखल घेत आत्मा विभागाच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. जिल्हाभरात आत्मा विभागामार्फत अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी पूर्वतयारी करणे, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश असल्याचे आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीमती सायली फासके यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान थीबा एग्रोच्या सदस्यांनी प्रकल्पाच्या उभारणीपासून ते मत्स्य विक्रीपर्यंतच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, माशांच्या विक्रीचे नियोजन, बाजारपेठेची उपलब्धता आणि पाण्याचे व्यवस्थापन याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मत्स्यपालनासोबतच पूरक शेतीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करण्यावर दिलेला भर. मत्स्यपालनातील पाण्याचा उपयोग करून अॅक्वापोनिक्स (Aquaponics) शेती करण्याची पद्धत तसेच त्याच पाण्याचा योग्य वापर करून सेंद्रिय शेती विकसित करण्याच्या शक्यता यांची माहिती यावेळी देण्यात आली. एकाच प्रकल्पातून मत्स्यपालन आणि शेती अशा दोन्ही माध्यमांतून आर्थिक लाभ मिळविण्याच्या दृष्टीने या पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून उभारलेला हा प्रकल्प ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मत्स्यपालन, पाण्याचे योग्य नियोजन आणि पूरक शेती यांची सांगड घालून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांचा उपयोग होऊ शकतो.
या प्रकल्प भेटीदरम्यान आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीमती सायली फासके, रत्नागिरीच्या बीटीएम सायली पाटील, खेडच्या अनुष्का मोहिते, संगमेश्वरच्या मृणाली यादव, लांजाच्या गौरी शेरे, चिपळूणचे पंकज कोरडे, दापोलीचे स्वप्निल यादव, गुहागरचे सागर आंबवकर, राजापूरचे प्रणय राठोड तसेच थीबा एग्रोचे सर्व सहकारी तसेच उमरे गावच्या सरपंच सौ. सायली मोहिते या देखील उपस्थित होत्या.
महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विकसित केलेला उमरे येथील हा बायोफ्लॉक मत्स्यपालन प्रकल्प जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


