मुख्य बातमी

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम उत्साहात

नऊ दिवस, नऊ महान स्त्रिया : विद्यार्थिनींच्या कृतीयुक्त अभिनयातून कर्तृत्वाला अभिवादन

रत्नागिरी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे ‘नवदुर्गांना वंदन’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. नऊ दिवस, नऊ महान स्त्रिया या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थिनींनी भारतीय इतिहास, समाजसुधारणा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, समाजसेवा, राजकारण आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महान स्त्रियांच्या भूमिका साकारून त्यांच्या कार्याला कृतीतून वंदन केले. यावेळी भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थिनींनी त्या – त्या चरित्राची सविस्तर माहिती आपल्या एकपात्री अभिनयातून सादर करत सर्वांची मने जिंकली.

या उपक्रमात अनुक्रमे राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले, रमाई आंबेडकर, अनुताई वाघ, इंदिरा गांधी, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला यांना कृतीयुक्त अभिनयातून वंदन करण्यात आले. त्यांच्या भूमिका अनुक्रमे तन्वी नितीन कुर्टे, श्रावणी उदय रहाटे, आराध्या विकास रहाटे, रिद्धी अजित कुर्टे, परी विश्वनाथ कुर्टे, निधी सागर घवाळी, समिता सचिन तांबटकर, सिद्धी अजित कुर्टे, त्रिषा हेमंत धनावडे यांनी साकारल्या.

या अभिनव उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सविता रमेश तोटावार, वाटद केंद्रप्रमुख श्रीम. मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे आणि शिक्षिका श्रीम. पुनम चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता नितीन कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, रमेश तांबटकर, उदय रहाटे, विश्वनाथ शिर्के, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, मदतनीस समीक्षा भास्कर घवाळी आणि शालेय पोषण आहार कर्मचारी अक्षरा विश्वनाथ शिर्के यांनी सहकार्य केले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींची तयारी, वेशभूषा आणि भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी पालकांनीही मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्त्रीशक्तीविषयी आदर, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा यावा यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे यांनी सांगितले. तर या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजावे अशी भूमिका असल्याचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता कुर्टे यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच ‘नवदुर्गांना वंदन’ या संकल्पनेतून महान स्त्रियांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा स्तुत्य प्रयत्न शाळेने केला असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उदय रहाटे यांनी व्यक्त केली.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना महान स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द, धैर्य, त्याग, समाजसेवा आणि कर्तृत्व यांची प्रेरणा मिळाली. नवरात्रोत्सव केवळ देवीपूजनापुरता मर्यादित न राहता समाजासाठी आदर्श कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या विचारांचे स्मरण आणि अनुकरण करण्याची संधी विद्यार्थिनींना मिळाल्याबद्दल शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!