ढगाळ हवामान व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आंबा व काजू बागांच्या संरक्षणासाठी कृषी सल्ला जारी

रत्नागिरी : सध्याच्या बदलत्या हवामानात आंबा आणि काजू बागांचे संभाव्य कीड व रोगांपासून रक्षण करण्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) तर्फे २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.
सध्या बहुतांश आंबा बागांमध्ये नवी पालवी फुटली असून काही ठिकाणी फुटण्यास सुरुवात झाली आहे. २३ ऑक्टोबर रोजी झालेला पाऊस आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे या कोवळ्या पालवीवर तुडतुडे, करपा रोग आणि शेंडे पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुडतुड्यांमुळे चिकटा पडून काळी बुरशी वाढू शकते.
यावर नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार खालील उपाययोजना करण्याचे आवाहन सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी केले आहे:
* तुडतुडे नियंत्रण: प्रती १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मि.ली. मिसळून फवारणी करावी.
* करपा रोग नियंत्रण: प्रती १० लिटर पाण्यात थायोफिनेट मिथाईल १० ग्रॅम मिसळून फवारणी करावी.
* शेंडे पोखरणारी अळी: कोवळ्या फुटीवर प्रादुर्भाव आढळल्यास प्रती १० लिटर पाण्यात टोलफेन पायराईड २० मि.ली. मिसळून फवारावे.
* औषधाचा चांगला परिणाम मिळण्यासाठी: फवारलेले औषध पालवीवर व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी व सर्वत्र पसरण्यासाठी द्रावणात ‘स्टीकर’ व ‘स्प्रेडर’ अवश्य मिसळावे.
* पालवीच्या पोषणासाठी: पालवी सशक्त व लवकर जून होण्यासाठी ०:०:५० आणि १३:०:४५ ही विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्ये स्वतंत्रपणे ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावीत.
काजू बागायतदारांसाठी मार्गदर्शन :
काजूच्या प्रसारित वाणांना (वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९, वेंगुर्ला-१०) नवीन पालवी येत असून वेंगुर्ला-१ व वेंगुर्ला-१० च्या काही झाडांवर मोहर दिसू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ढेकण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी नवीन पालवीवर प्रति १० लिटर पाण्यात लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ६ मि.ली. मिसळून कीटकनाशकाची फवारणी करावी. तसेच झाडांच्या बुंध्यात जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी सेंद्रिय/जैविक आच्छादन (मल्चिंग) करावे.



