ऑफ्रोह महिला आघाडी मजबूत करण्यासाठी जानेवारी २०२७ मध्ये रत्नागिरीत विभागीय महिला मेळावा

रत्नागिरी : ऑफ्रोह संघटना बांधणीसाठी व महिला आघाडी मजबूत करण्यासाठी पुढील वर्षभरात ५ विभागात ५ महिला मेळावे घेणार असून, पहिला दौरा रत्नागिरीतून सुरू करण्यात येणार असून, १७ जानेवारी २०२७ ला रत्नागिरीत कोकण विभागीय महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष प्रिया खापरे यांनी केली.
ऑफ्रोह व महिला आघाडी ठाणेच्या वतीने माणिक हॉल, कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथे आयोजित मासिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर “ऑफ्रोह”चे राज्य प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर,ऑफ्रोह राज्य सदस्य नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, अजय कोळी, कोकण विभागीय सचिव संदेश चोगले, जिल्हाध्यक्ष रोहित तरे, ऑफ्रोह राज्य सदस्य व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निर्मला पाडळकर, ठाणे जिल्हा महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष स्मिता भोईर, ऑफ्रोह ठाणे सचिव हिरामन सोनवणे, कोषाध्यक्ष किशोर लिमजे, प्रकाश कोळी इ. ठाणे शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व संघटनात्मक बांधणीवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ. प्रिया खापरे यांचा ऑफ्रोह ठाणे शाखेच्या वतीने शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच ऑफ्रोह राज्य कार्यकारिणीतील नवनियुक्त मान्यवर सदस्यांचे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
राज्य प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा ऑफ्रोह पाठपुरावा करणारच व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे यांनी आपली ऑफ्रोह ही मानवाधिकार संघटना असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच इतर सामाजिक प्रश्नासाठीही आपण काम करायला हवं ,असे सांगितले.
घनश्याम हेडाऊ यांनीही ऑफ्रोहच्या संघटात्मक बांधणीबाबत व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ऑफ्रोह ठाणे सचिव हिरामन सोनवणे व सूत्रसंचालन निर्मला पाडळकर यांनी केले. आभार नरेश खापरे यांनी मानले. या सभेला ऑफ्रोह ठाणे व महिला आघाडीचे सदस्य उपस्थित होते.



