दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ४५ वाहनचालकांचे रक्तदान; वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशनच्या वतीने संत-कृपा ट्रॅव्हल्स, मोशी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ४५ वाहनचालकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

संस्थेचे सचिव ललित सोनार आणि संत-कृपा ट्रॅव्हल्सचे मालक दशरथ पानमंद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून ४५ वाहनचालकांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या या योगदानातून मानवतेचा आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला.
दसऱ्याच्या सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल रक्तदान करणाऱ्या सर्व वाहनचालकांचे फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमातून समाजसेवा, मानवता आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल संत कृपा ट्रॅव्हल्सचे मालक दशरथ बबन पानमंद यांनी संस्थेचे सचिव ललित सोनार व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

