पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी वाचवा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन
भविष्यातील जलसंकट रोखण्यासाठी दैनंदिन सवयींमध्ये बदलांची गरज

रत्नागिरी : वाढत्या उन्हाबरोबर जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा अपव्यय तातडीने थांबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. आजची पाण्याची बचतच आपल्या उद्याचे भविष्य सुरक्षित ठेवू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पाण्याला कोणताही पर्याय नाही. सध्या नळ चालू केल्यावर पाणी सहज मिळते म्हणून अनेकदा त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. मात्र, भविष्यात तीव्र टंचाई निर्माण झाल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील. पाणी हे विकत मिळणारे केवळ एक साधन नसून, निसर्गाने दिलेले अनमोल वरदान आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.”
दैनंदिन सवयींमध्ये बदलांचे आवाहन
पाणी बचतीसाठी नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात पुढील साध्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकाराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले आहे.
दात घासताना, दाढी करताना अथवा भांडी आणि कपडे धुताना नळ सतत चालू ठेवू नये, घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी नळ अथवा पाईपलाईनमधून होणारी पाण्याची गळती त्वरित दुरुस्त करावी. एका छोट्या गळतीमुळे दिवसाला शेकडो लिटर पाणी वाया जाते. स्वयंपाकघरात भाज्या आणि फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी झाडांना टाकून त्याचा पुनर्वापर करावा.
“थेंब थेंब पाण्याचा, आधार उद्याच्या जगण्याचा!” हा संदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला पाणी बचतीचा संकल्प करण्याचे आणि आपला परिसर जलसमृद्ध करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



