अंजणारी पुलाजवळ कंटेनरची हातखंबा टॅपच्या पोलीस वाहनाला धडक
पोलिस कर्मचारी संतोष गायकवाड यांच्यासह ट्रकचालकाचा मृत्यू; एक गंभीर

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलाअलीकडील उतारावर शनिवारी रात्री लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने हातखंबा वाहतूक शाखेच्या (टॅप) शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांचा मृत्यू झाला. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या २२ टायरच्या ट्रेलरने सरकारी बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे गंभीर जखमी झाले असून, ट्रेलर चालकाचाही मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
ही धडक इतकी भीषण होती की, पोलिसांचे शासकीय वाहन थेट नदीच्या खोल उतारावर जाऊन पलटी झाले, तर कंटेनरही रस्त्यालगत उलटला. या दुर्घटनेत वाहनातील दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले, तर कंटेनरचा चालकही आत अडकल्याने गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनारी घाटाखाली नदीपात्रात एक वाहन कोसळल्याची माहिती लांजा पोलीस ठाण्याला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक मदत केंद्रातील एएसआय संतोष गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे सरकारी बोलेरो जीप (एमएच ०८ बीई ३५६१) घेऊन मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झाले. अंजनारी पुलाच्या सुमारे शंभर मीटर अलीकडे तीव्र उताराच्या वळणावरून जात असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रेलरने (आरजे ०९ जीई २३९७) त्यांच्या जीपला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर बोलेरो जीप रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सुमारे ८० ते १०० फूट खोल दरीत कोसळली. ट्रेलरही रस्त्यावरून खाली घसरून उलटला. या भीषण अपघातात सरकारी जीपचा चुराडा झाला. वाहनाचे छप्पर, दरवाजे आणि आतील भाग पूर्णपणे चेपल्याने त्यामध्ये अडकलेल्या दोन्ही पोलीस अंमलदारांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठे प्रयत्न करावे लागले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात खोल दरीत उतरून पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्त बोलेरोमधून दोन्ही पोलिसांना बाहेर काढून प्रथम पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच एएसआय संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे यांच्यावर रत्नागिरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना आयसीयू सुविधेच्या रुग्णवाहिकेतून सांगली येथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बोलेरोला धडक देणारा ट्रेलर उलटल्याने त्याचा चालक केबिनखाली अडकला. या दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रेलर महामार्गावरून बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
बचावकार्य आणि घटनास्थळावरील कार्यवाहीदरम्यान पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एएसआय भुजबळराव, राणे, नाईकवाडे, बाजागे, मारळकर आणि विलास जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. मध्यरात्रीच्या अंधारात सुरू झालेल्या या बचावकार्यात पोलिसांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
दुसऱ्या अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी निघालेल्या पोलीस पथकावरच ही दुर्घटना ओढवल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्य बजावत असताना एएसआय संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने हातखंबा परिसरासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. या अपघाताबाबत पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.



