मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नो कॉम्प्रोमाइज : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : अमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाईझ. अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरू करावी. कोणाचाही फोन आला तर, त्याची डायरीला नोंद घ्या, असे निर्देश देतानाच, पोलिसांच्या या मोहिमेला प्रसिध्दी माध्यमांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अमली पदार्थ विरोधी कार्यवाही, नियंत्रण व जनजागृतीबाबत आज (१२ एप्रिल) आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर ‍सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अमली पदार्थाचा थेट परिणाम युवा पिढीवर होत आहे. हे प्रत्येक गावाचे दु:ख आहे. ग्रामीण भागातील युवक मृत्युमुखी पडत आहेत. पोलीस चांगले काम करीत असतात. या सामाजिक मोहिमेत माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे. अमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाहीत. आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत, हे दिसून येते.

राज्यात अमली पदार्थ मुक्त आपला रत्नागिरी जिल्हा करू. अमली पदार्थ मुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल, अशा पध्दतीने ही मोहीम तीव्र राबवावी.

अमली पदार्थाचे सेवन करणाराही विक्री करणाऱ्या एवढाच दोषी आहे. अंमली पदार्थ विक्रेता आणि त्याचे सेवन करणारा या दोघांवरही सारखीच कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवन करु नये. त्याची विक्री करणारे तसेच वापर करणारे यांच्याविषयीची माहिती जर, कोणाला असेल तर त्यांची नावे पोलीसांना कळवावीत. कळवणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

अमली पदार्थाचे हे लोण कधी तरी आपल्या घरातही पोहचेल. याचे भान पोलीसांसह सर्वांनी ठेवावे. त्यामुळे अमली पदार्थाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नो कॉम्प्रोमाईझ अशी कठोर भूमिका घ्यावी. अशा आरोपींना पाठीशी घालणारे जर कुणाचेही फोन आले, तर त्याबाबतीत पोलिसांनी धाडस दाखवावे व तशी डायरीला नोंद घ्यावी. अशांची नावे प्रसिध्दी माध्यमांना द्यावीत. पोलिसांनी मनावर घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने कारवाई करू शकतात, हे या मोहिमेत पोलिसांनी जनतेला दाखवून द्यावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!