गणेश किर्वे यांना गुहागर तालुका अपंग संस्थेतर्फे “दिव्यांग साथी” पुरस्कार जाहीर
३० एप्रिल रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गणेश जगन्नाथ किर्वे यांना गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने “दिव्यांग साथी” पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण उद्या (३० एप्रिल) सकाळी ११.३० वाजता अपंग संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा (ता. गुहागर) येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
गुहागर तालुक्यात दिव्यांग आणि दिव्यांगासाठी स्थापन केलेली सेवाभावी संस्था असून या संस्थेचे रीतसर नोंदणी आहे. या संस्थेचे १४०० हून अधिक दिव्यांग सभासद आहेत. गेली २३ वर्ष दिव्यांगांसाठी वेगवेगळे यशस्वी उपक्रम या संस्थेच्या वतीने राबवले जात आहेत. या संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दिव्यांग साथी पुरस्कार जाहीर झालेले गणेश किर्वे हे वरवेली गावचे रहिवाशी असून वरवेली ग्रामपंचायतचे ते माजी सदस्य, गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाचे सहसचिव, रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे प्रसिद्धी प्रमुख, गुहागर तालुका प्रेस क्लबचे सचिव तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांमध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
अपंग संस्थेच्या स्थापनेपासून अपंग संस्थेला पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचे मोलाचे योगदान आहे. गेली २५ वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये ते काम करत आहेत. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व दिव्यांगांसाठी व इतर विविध घटकांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेच्या वतीने “दिव्यांग साथी” पुरस्कार देण्यात येणार असल्याचे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणग यांनी सांगितले.



