मुख्य बातमी

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

‘सहकार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन

रत्नागिरी : कोकणातील तारांकित मानांकित अशा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर प्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते सकाळी ठिक ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सामुहिकरित्या म्हणण्यात आले.

महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये सत्रांत सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागाच्या वार्षिक अंकांचे, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात. अकॉटिंग फायनांस विभागाच्या वतीने कोकणातील सामाजिक आर्थिक समस्येसंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या शोध-निबंधाचा समावेश ‘होरायझन’ या वार्षिक अंकात करण्यात आला आहे. विभाग प्रमुख सुहास नागले यांनी या वार्षिक अंकांचे संपादन केले. महाविद्यालयातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. वाणिज्य विभागाच्या ‘प्रतिबिंब’ या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तंत्रज्ञान आणि वाणिज्य या विषयावर आधारित या अंकात विद्यार्थ्यांच्या लेखनाचा समावेश करण्यात आला. वाणिज्य विभागातील प्राध्यापिका रसिका नाचणकर यांनी या अंकाचे संपादन केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडणाऱ्या ‘सहकार’ या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षीच्या वार्षिक अंकाचे संपादक प्रा. वासुदेव आठल्ये यांनी अंकांच्या निर्मितीचा प्रवास मांडला. ते म्हणाले की, या वर्षीचा सहकार हा आयएसबीएन युक्त असल्याने सहकार अंकाची ओळख जागतिक पातळीवर निर्माण होईल.महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक उपक्रमांचा, प्रगतीचा दस्ताऐवज म्हणून तो विचारात घेतला जाईल. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला इथे अवकाश मिळाला आहे. माहिती संकलनाची सुव्यवस्थित पद्धती विकसित केल्याने त्याचा उपयोग नॅक चा अहवाल लिहिताना होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी योगिता प्रिंटर्सचे व्यवस्थापक आशिष खानोलकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विविध विभागांच्या वार्षिक अंकाच्या आणि सहकार वार्षिक अंकाच्या प्रकाशन समितीचे कौतुक केले. सहकार वार्षिक अंकास आयएसबीएन मिळविण्यात महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयातील उपक्रमाचा मागोवा घेत प्रगतीपथावर असलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. भविष्यातील निर्धारित उपक्रमाचा वेध त्यांनी घेतला. पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप सहविचार सभेत मांडले. शिक्षक, प्राध्यापकांनी नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके लिहिण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी कलाशाखेच्या उप-प्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्ण, वाणिज्य विभागाच्या डॉ. यास्मिन आवटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. सुनील गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!