अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची प्रमोद गांधी यांच्याकडून पाहणी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या असून, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धोपावे, वेलदूर नवानगर भागाची मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर , तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी पाहणी केली.

यावेळी धोपावे सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, आदेश पवार, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख कार्यकर्ते, नुकसानग्रस्त नागरिक, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अवकाळी पावसाने झालेल्या नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसान ग्रस्तांना मनसे पक्षाच्या वतीने काय मदत करू शकतो, तालुक्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात आपण काय मागणी करू शकतो याबाबत चर्चा केली. तसेच यावेळी धोपावे सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, आदेश पवार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
पावसाच्या पाण्याचा पूर व समुद्राच्या भरतीमुळे खाडीला वाढलेले पाणी यामुळे धोपावे गणेशनगर येथील ५० हून अधिक मच्छीमार समाजातील नागरिकांच्या वस्ती, घरांमध्ये चार ते पाच फूट उंचीचे पाणी घुसले आहे. घरातील सर्व धान्य कडधान्य, कपडे व इतर साहित्य भिजून गेले आहे, घरामध्ये वास्तव्य करू शकत नाही अशी अवस्था झाली आहे. या सर्व नागरिकांना ग्रामपंचायतीने स्थलांतरित होण्याची नोटीस दिली आहे. या भागाची मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी भर पावसात पाहणी केली. या मच्छीमार समाजातील वस्ती लगत असलेल्या खाडी (नदी)ला संरक्षक भिंत उभारणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत आम्ही तहसीलदार व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन प्रमोद गांधी यांनी दिले.

वेलदूर नवानगर येथे घराशेजारी दरड कोसळली असून याचीही पाहणी यावेळी करण्यात आली. वेलदूर ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली. मनसे गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, रानवी शाखाध्यक्ष सुर्वे, राहुल जाधव यांच्या मनसैनिक उपस्थित होते.



