“अनबॉक्स”च्या वर्धापन दिनानिमित्त “गाती सुरेल तारा” कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : अनबॉक्स युअर डिझायर या ॲप ८ जून रोजी सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त ग्राहक आणि रसिकांसाठी “गाती सुरेल तारा” या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ८ जून रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे संध्याकाळी ७ वाजता होणार असून सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे.
या ॲपचे सर्वेसर्वा गौरांग आगाशे हे “अनबॉक्स”च्या माध्यमातून प्लॅस्टिक कचरा संकलन, ई-कचरा संकलन तसेच समाजातील विविध कारागिरांना एकत्रित करून त्यांना व्यासपीठ देणे आदी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याला रत्नागिरीकरांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. या ॲपच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ८ जून रोजी ग्राहकांसाठी व सर्व रसिकांसाठी गाती सुरेल तारा* कार्यक्रम आयोजित केला आहे. , जो सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.
“गाती सुरेल तारा” हा रत्नागिरीतील व्हायोलिन वादक उदय गोखले यांची संकल्पना असलेला कार्यक्रम असून, दोन ते अडीच तासांच्या या कार्यक्रमात रसिकांना व्हायोलिन या वाद्यावर विविध हिंदी, मराठी जुन्या नव्या, गाण्यांचा आनंद घेता येणार आहे.
पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटल स्वरूपाच्या असलेल्या या कार्यक्रमात व्हायोलिनवर उदय गोखले असतील. त्यांना राजन किल्लेकर (की बोर्ड), विनय चेउलकर (की बोर्ड), सचिन भावे (तबला), शैलेश गोवेकर (बेस गिटार), गणेश साळोखे (अकॉस्टिक गिटार), किरण ठाणेदार (हँडसोनिक) हे साथसंगत करतील. निबंध कानिटकर हे या कार्यक्रमाचे निवेदन करतील. या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन एस. कुमार साउंड चे श्री उदयराज सावंत करणार आहेत.
सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अनबॉक्स युवर डिझायरचे सर्वेसर्वा गौरांग आगाशे यांनी केले आहे.



