सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा
सोमेश्वर ग्रामस्थांची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील मौजे सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कायम स्वरूपी लाईट ये-जा करत असते. याबाबत योग्य ती उपाययोजना करून सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजेचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावावा, या मागणीसाठी सोमेश्वर ग्रामस्थ आज (३० मे) महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कायम स्वरूपी लाईट ये-जा करत असते. या संदर्भात यापूर्वीहीग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा अवलंबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. तसेच यापूर्वी केलेल्या पत्र व्यवहारांनाही महावितरणकडून योग्य तो न्याय देण्यात आलेला नाही. उन्हाळ्यात विजेचा इतक्या मोठ्या प्रमाणात लपंडाव सुरू असेल, तर आता पावसाळा तोंडावर आलेला असता या पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. घरामध्ये वयोरुद्ध आजारी माणसे, लहान मुले यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
महावितरणकडून योग्य ती उपाययोजना करून सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अन्यथा ग्रामस्थांचा सहनशीलतेचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल, अशा इशारा यावेळी सोमेश्वर ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.



