आरोग्यआर्टिकल

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि तंबाखू सेवन कमी करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे आयोजन जागतिक आरोग्य संघटना (WHO) करते. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करणे आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर रोखणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने, तंबाखूचे दुष्परिणाम समजून घेऊन, तंबाखू सेवन टाळण्याचा आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचा संकल्प करावा, हेच या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 २०२५ ची अधिकृत थीम आहे : “Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products”

“आकर्षणाचा मुखवटा उतरवा : तंबाखू व निकोटीन उत्पादनांवरील उद्योगाच्या युक्त्या उघडा करा”. “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करा”. या थीममुळे मुलांना तंबाखूच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.

 इतिहास : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९८७ साली तंबाखू विरोधी दिन सुरू केला. पहिल्यांदा ७ एप्रिल १९८८ रोजी हा दिवस साजरा करण्यात आला, त्यानंतर दरवर्षी ३१ मे रोजी हा दिवस पाळला जातो.

 महत्त्व : तंबाखू सेवनामुळे फुफ्फुसांचा, तोंडाचा व घशाचा कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, दात व हिरड्यांचे विकार, मधुमेह,महिलांमध्ये गर्भधारणेचे त्रास व अर्भकावर वाईट परिणाम यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे (Passive Smoking) इतर निरोगी व्यक्तींनाही धोका दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. या दिवसाच्या निमित्ताने तंबाखूचे दुष्परिणाम, त्याची सवय सोडण्याचे फायदे, आणि तंबाखू नियंत्रणासाठीचे उपाय याबद्दल जनजागृती केली जाते.

उपक्रम

 शाळा, महाविद्यालये, आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीमा

 तंबाखू सोडण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे

 तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी

 धूम्रपानमुक्त परिसराची निर्मिती

 COTPA कायदा 2003 : COTPA (Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003) हा भारत सरकारने लागू केलेला कायदा आहे, ज्याचा उद्देश तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी आणणे आणि त्यांच्या व्यापार, उत्पादन, पुरवठा व वितरणाचे नियमन करणे हा आहे. हा कायदा लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी, विशेषतः मुलांना आणि युवकांना तंबाखूच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी बनवण्यात आला आहे.COTPA कायदा २००३ हा तंबाखूच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, जाहिरात, विक्री आणि पॅकेजिंगसंबंधी कठोर नियम घालण्यात आले.

 COTPA कायदा २००३ मधील महत्त्वाच्या तरतुदी:

 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी.

 तंबाखूजन्य पदार्थांची थेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात, प्रोत्साहन किंवा प्रायोजकत्वावर बंदी.

 १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी.

 शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी.

 तंबाखू उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आरोग्यविषयक इशारे अनिवार्य.

 उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंड व शिक्षा.

 तंबाखू जन्य पदार्थ सेवनाचे आकडेवारी : भारतात सुमारे २ कोटी ६७ लाख प्रौढ (१८ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे) तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. २०१६-१७ च्या ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS) नुसार, भारतीय प्रौढांपैकी ३५% लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. त्यापैकी:२१% लोक धूरविरहित तंबाखू (गुटखा, खैनी, जर्दा, मावा इ.) वापरतात९% लोक धूम्रपान (सिगारेट, बिडी) करतात.५% लोक दोन्ही प्रकारचे सेवन करतात.

आरोग्यावरील परिणाम

 तंबाखू सेवनामुळे भारतात दरवर्षी सुमारे १३.५ लाख मृत्यू होतात.

 तंबाखू सेवनामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, श्वसनाचे आजार, तोंडाच्या व घशाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

 तोंडाचा, घशाचा आणि आतड्यांचा कर्करोग झालेल्या जगातील ५७.५% रुग्ण भारतात आहेत.

 तंबाखूचे व्यसन प्रामुख्याने युवकांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

 भारत तंबाखू उत्पादनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षक पॅकेजिंग आणि विपणन यामुळे युवकांचे सेवन वाढते.

 तंबाखूच्या सेवनामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (passive smoking) दोन्ही प्रकारे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

 भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे मोठ्या प्रमाणावर असून, विशेषतः युवकांमध्ये वाढते आहे. यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू आणि गंभीर आजार होतात, तसेच देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो.

 तंबाखूजन्य पदार्थांपासून वाचण्याचे उपाय:-

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःमध्ये तंबाखू सोडण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करा. स्वतःला आणि कुटुंबाला होणारे नुकसान लक्षात ठेवा.

 सकाळी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्या.

 पुदिन्याची पाने, दालचिनीचा तुकडा किंवा बडीशेप चघळा.

 जेवणानंतर तंबाखूऐवजी फळ, च्युइंगम किंवा शुगरलेस गम खा.

 भरपूर पाणी, ज्यूस, ग्रीन टी प्या. यामुळे शरीरातील निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते.

 तंबाखूची इच्छा झाली की दुसरे काम करा, मित्रांशी बोला, पुस्तक वाचा, चित्र काढा किंवा व्यायाम करा.

 व्यायाम आणि ध्यान : १०-१५ मिनिटे ध्यानधारणा करा. यामुळे मनावर ताबा मिळवता येतो.

 निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी आणि औषधे : निकोटिन पॅच, निकोटिन गम, लॉझेन्जेस, इनहेलर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे वापरू शकता.

 व्यसनमुक्ती केंद्र किंवा हेल्पलाईन (उदा. १८००-२२७७८७) वरून समुपदेशन घ्या.

 आहारात बदल : व्हिटॅमिन C समृद्ध फळे (संत्रे, पेरू, किवी) खा. ताज्या भाज्या, गाजराचा रस यांचा वापर करा.

 सोशल सपोर्ट : तंबाखू सोडलेल्या लोकांशी बोला, त्यांचा अनुभव जाणून घ्या.

तंबाखू सोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या योजना

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) : भारत सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) सुरू केला आहे. या अंतर्गत तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन, जनजागृती, आणि उपचार सुविधा दिल्या जातात.

 राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन (Quitline) : तंबाखू सोडण्यासाठी मदत करणारी ‘राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन’ (Quitline) उपलब्ध आहे. टोल-फ्री क्रमांक 1800-227787 वर कॉल करून मोफत समुपदेशन मिळू शकते. या सेवेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी इ. भाषांमध्ये मार्गदर्शन दिले जाते.

 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांची मदत : अनेक सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्तीसाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT), समुपदेशन, वर्तणूक थेरपी आणि सपोर्ट ग्रुप्स उपलब्ध आहेत. तंबाखू सोडण्यासाठी मोफत समुपदेशन, शाळांमध्ये जनजागृती, शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून देणे, दातांची तपासणी व समुपदेशन करून तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविले जातात.

 जनजागृती मोहिमा : शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी प्रचार माध्यमातून जनजागृती धूम्रपान विरोधी कायद्याची अंमलबजावणी (COTPA, 2003):सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, विक्री मर्यादा.

जनतेसाठी आवाहन आहे कि तंबाखूच्या आकर्षणापासून दूर राहा, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करू नका, आपल्या मुलांना यापासून वाचवा“मी तंबाखूचा विरोध करतो” हा निश्चय करा.आरोग्य विभाग,जिल्हा परिषद रत्नागिरी, तंबाखू विरहित आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे.चला, तंबाखूला कायमची ‘नाही’ म्हणूया आणि आरोग्यदायी समाज घडवूया!

“आरोग्यासाठी तंबाखूला नकार – जीवनासाठी सकारात्मक स्वीकार!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!