मुख्य बातमी

राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी सजगता हवी : समीर कर्वे

रत्नागिरी : “शत्रू कोणत्या रूपात समोर येईल सांगता येणार नाही. युध्दजन्य परिस्थितीत रियल टाईम प्रक्षेपणाचा मोह टाळता आला पाहिजे. त्यासाठी स्वयं निर्बंध असावेत. दहशतवादी हल्ला, युध्दजन्य संघर्ष सर्वप्रथम पहिला बळी सत्याचा जातो. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आपल्या अंगात सजगता आणावी लागेल,” असे मार्गदर्शन महाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी केले.

विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत ‘युध्दजन्य परिस्थितीतील वार्तांकनाची जबाबदारी’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.

संगणकीय सादरीकरण करत श्री. कर्वे यांनी आपले मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अशा परिस्थितीत रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग अनुभवत असतो. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी बातम्यांमधून लक्षात येते. दहशतवादी हल्ला युध्दजन्य संघर्षात पहिला बळी सत्याचा जात असतो. बातम्यांमध्ये नाट्यमयता वाढलेली आहे. आपल्या बातम्यांच्या प्रक्षेपणामुळे शत्रूला फायदा तर होणार नाही ना, याचे भान ठेवायला हवे. कारण, कुणीतरी आहे तिथे हे लक्षात घेतले पाहिजे. कराची उद्ध्वस्त केले, कोणी इस्लामाबाद उद्ध्वस्त केले, अशा बातम्या येत होत्या. समाज माध्यमातून त्या फिरत होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात जे थोडे होते, त्याच्यापेक्षा एवढे मोठे दाखविले की, आपण आपली विश्वासार्हता गमावून बसतो.”

“विक्रांत ही विमानासाठीची तरंग धावपट्टी आहे. विक्रांतने फायरिंग सुरू केले, अशा बातम्याही येत होत्या. त्यामुळे अधिकृत माहिती मिळविणे, शासनाच्या विभागाकडून झालेल्या निवेदनावर बातमी करणे हिताचे ठरते. संरक्षण दलाने केलेल्या सूचनांचे पालन करणे, स्वत:च्या जीवाची काळजी घेणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वत:ला तयार करणे हे अधिक महत्वाचे आहे. दहशवाद्यांच्या दृष्टीने पत्रकारांची किंमत जास्त असते. त्यामुळे त्यांचे आपल्यावर लक्ष असते त्याबाबत सतर्कता असावी. रियल टाईम प्रसारणाचा मोह टाळला पाहिजे त्याबाबत घाई करू नये, असे सांगून इस्त्राइलमधील गाझा पट्टीचे उदाहरण सांगितले. शांततेच्या काळात आपली तयारी हवी. सजगता हवी. ही सजगता सर्व क्षेत्रासाठी नेहमीचा विषय बनला पाहिजे,” असेही ते शेवटी म्हणाले.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!