मुख्य बातमी

रेल्वे स्थानकातील विश्रामगृहात चोरी करणारा रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात

१०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकातील विश्रामगृहात (Executive lounge) चोरी करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील वातानुकूलित विश्राम गृहात दर तासाच्या भाड्याप्रमाणे तेजस अजित छाबडा (३२, रा. इगतपुरी लोहिया रोड, नगर परिषद जवळ, जि. नाशिक) विश्रांतीसाठी काही दिवस थांबला होता. ६ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तेजस याने तेथील रिसेप्शनिस्टची नजर चुकवून व उचित संधी साधून तेथील रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम २५ हजार रुपये असलेला डबा चोरून पळून गेला होता.

या बाबत रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कुवारबाव चौकीमधील उपस्थित पोलिसांना याची माहिती मिळाली. या घटनेची गंभीर दखल घेत कुवारबाव पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार हे तात्काळ रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनी रिसेप्शन काऊंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यााचे फुटेज तपासले असता आरोपीच्या अंगावरील कपडे व त्याचा पेहराव हेरून तो रिक्षात बसल्याचे निष्पन्न केले.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील डिटेक्शन टीमच्या अंमलदारांमार्फत या रिक्षाचा रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी एसटी स्टँड असा तात्काळ पाठलाग करण्यात आला व आटोपीला एसटी स्टँड येथून लागलीच ताब्यात घेण्यात आले. तेजस छाबडा याला या पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून चोरण्यात आलेला मुद्देमाल (रोख रक्कम २५ हजार रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.फौ. दीपक साळवी, पो.हवा. अरुण चाळके, कुवारबाव चौकीतील पो.हवा. संतोष गायकवाड, पो.हवा. महेंद्र खापरे, पो.हवा. राकेश तटकरी, पो.हवा. निलेश कांबळे व चा.पो.हवा. ओंकार सावंत यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!