आरोग्यमुख्य बातमी

कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाची छाप 

जिल्ह्यात १३७ शासकीय आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : “कायाकल्प” ही एक लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना सक्षम, स्वच्छ, विश्वासार्ह व रुग्णाभिमुख बनवण्याचे हे प्रभावी पाऊल आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२४-२५ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्यातील १ ग्रामीण रुग्णालय, १९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११६ आरोग्य उपकेंद्र आणि १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे.

यामध्ये चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्हास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार पटकावला असून, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम २ लाख लाख जाहीर झाली आहे. उर्वरित १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पुरस्कार रक्कम ५० हजार जाहीर झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर पुरस्कारामध्ये चिपळूण तालुक्यातील रामपूर, कापरे, अडरे, खरवते, राजापूर तालुक्यातील धारतळे, सोलगाव, गुहागर तालुक्यातील कोळवली, दापोली तालुक्यातील पिसई, आसूद, उंबर्ले, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, बुरंबी, वांद्री, लांजा तालुक्यातील रिंगणे, साटवली, शिपोशी, रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कोतवडे यांचा समावेश आहे.

दापोली तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र शिरखळला उपकेंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम १ लाख रुपये, तसेच उपकेंद्र माटवन व उपकेंद्र खेरडी यांना समान गुणांमुळे प्रथम रनर अप असलेली पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये विभागून प्रत्येकी पुरस्कार रक्कम २५ हजार रुपये जाहीर झाली आहे. उपकेंद्र पालगड द्वितीय रनर अप पुरस्कार रक्कम ३५ हजार रुपये व उर्वरित ११२ आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम हजार रुपये जाहीर झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय देवरुखला ग्रामीण रुग्णालयस्तर प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम १ लाख रुपये जाहीर झाली आहे. या कायाकल्प पुरस्कारासाठी सर्व आरोग्य संस्थाना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!