रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

रत्नागिरी : शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत नवीन शैक्षणिक वर्ष सन-२०२५-२६ चा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी अप्पर पोलिस अधीक्षक जिल्हा जयश्री गायकवाड, शहरपोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शालेय समिती सदस्य मनोज पाटणकर, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. शिवरकर, शालेय समिती सदस्य श्री. पाटणकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून ढोल-ताशांच्या गजरात शाळेत स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना, आपला चिरंजीव या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे नमूद करून शाळेचे दर्जेदार शिक्षण, शिस्त व विद्यार्थी सुरक्षा याबद्दल विद्यार्थी व पालकांना माहिती देऊन शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी नवागतांच्या पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी नियोजित अभ्यासक्रम, शालेय उपक्रम, शिस्त विषयक नियम, कार्यालयीन कागदपत्रे याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशालेतील उपमुख्याध्यापक सौ. पी. एम. पवार यांनी उपस्थित मान्यवर, पालक यांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्री. पडवेकर यांनी केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सौ. पी. एस. कांबळे, श्री. मयेकर, श्री. लिंगायत, श्री. आयरे आदी ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते.



