मुख्य बातमी

श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा, बळ कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम पारंपारिक पद्धतीत होणार आहे. पहिली ग्रामप्रदक्षिणा शनिवारी (ता. ५) जुलै व दुसरी ग्रामप्रदक्षिणा २० जुलै रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल.

मंदिरातून पालखी खालची आळी मार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत (खोत) यांच्याकडे थांबेल. त्यानंतर पुढे जोशी पाळंद मार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबेल. पुढे फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंड मधील सहाणेवर थांबेल. नंतर अठरा हाताच्या गणपती मंदिरमार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी येथे येईल. त्यानंतर तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारुती आळीतून पऱ्याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठल मंदिर मार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळीमार्गे रात्री १० वाजता श्री देव भैरी मंदिरामध्ये येईल. गाऱ्हाणे होऊन ग्रामपदक्षिणा कार्यक्रम संपेल.

येत्या ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भैरीची बळ बाहेर पडणार आहे. ग्रामप्रदक्षिणा व बळ या सर्व उत्सवामध्ये बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ, भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!