दापोलीत भावाने केला भावाचा खून

दापोली : तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय ३६, रा. उन्हवरे बौद्धवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेने दापोलीसह जिल्हा हादरला आहे. शनिवारी मध्यरात्री हा खून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. दापोली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
काल दुपारी भावकी सोबत बैठक झाली. या बैठकीत विनोदने रवींद्र याला काही अपशब्द बोलले होते. त्याचाच राग मनात धरून रात्री वाद झाला आणि याच वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी संशयित रवींद्र याला ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे.



