रत्नागिरीत शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेवर व्याख्यान व डॉ. जयंत नारळीकरांना आदरांजली

रत्नागिरी : १९ जुलै म्हणजे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा वाढदिवस. यानिमित्त डॉ. नारळीकर यांच्या आठवणी व त्यांना श्रद्धांजली तसेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्या संदर्भातील रंजक व वैज्ञानिक माहिती आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी खगोल अभ्यास केंद्र व ISRO Registered Space Tutor या दोन विभागामार्फत भौतिकशास्त्र विभाग येथे डॉ. नारळीकर यांच्या “चार नगरातील माझे विश्व” या आत्मचरित्रातील निवडक कथाभागाचे वाचन ऋचा वझे यांनी केले. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेविषयी आर्या पारकर यांनी पावर पॉइंट सादरीकरण केले.

डॉ. नारळीकर यांनी यावर्षीच या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणी अनेक व्यासपीठावर जागवण्यात आल्या. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची यशस्वी अंतराळ मोहीम आता नुकतीच पार पडली आहे. खरंतर या दोन्ही गोष्टी विद्यार्थी वर्गात विज्ञान विषयक जाणीव निर्माण करण्यासाठी चालून आलेल्या संधी आहेत. या कार्यक्रमासाठी मयुरेश तांबे या विद्यार्थ्यांने मदत केली. हे तीनही विद्यार्थी द्वितीय वर्ष विज्ञानाचे आहेत. प्रा. बाबासाहेब सुतार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक मिळून ४० जणांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे हे दोन्ही उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने घडवून आणले ही एक समाधानाची बाब. या निमित्ताने त्या विद्यार्थ्यांचे वाचन झाले व डॉ. नारळीकरांचे चरित्र त्यांच्या पुढे आले.
अंतराळ स्थानक, ऍक्सिओम मोहीम, शुभांशु यांचे वैज्ञानिक प्रयोग या विषयी प्राथमिक माहिती उपस्थितांना झाली.



