मुख्य बातमी

गोळप, दाभीळवाडी आणि काळबादेवी मार्गावरील बस फेऱ्यांच्या समस्यांबाबत युवासेनेचे निवेदन

नवीन बस फेरी सुरू करण्याची मागणी : सकारात्मक विचार न केल्यास ८ दिवसांत आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप, दाभीळवाडी आणि काळबादेवी मार्गावरील बस फेऱ्यांच्या समस्यांबाबत आणि नवीन बस फेरी सुरू करण्याबाबत आज रत्नागिरीचे विभाग नियंत्रक यांना युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी निवेदन दिले. मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा येत्या ८ दिवसांत युवासेनेतर्फे प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

फणसोप हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोळप, दाभिळ वाडी, माने वाडी या भागातील ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी बसची कोणतीही सोय नाही. सध्या हे विद्यार्थी दर्गा स्टॉप किंवा पावस मुख्य रस्त्यावर येण्यासाठी नदीच्या धोकादायक पुलाचा आधार घेत आहेत. पावसाळा जवळ येत असताना ही बाब अत्यंत जीवघेणी ठरू शकते. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी गोळप- दाभिळ वाडी – माने वाडी – दर्गा स्टॉप – पावस या मार्गावर तातडीने सकाळी ९.३० वाजता आणि संध्याकाळच्या सत्रात ५.४५ वाजता बस फेरी सुरू करावी. तसेच अनेक बस फेऱ्या दुपारच्या सत्रात वेळेवर उपलब्ध नसतात. सध्याच्या कडाक्याच्या उन्हात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्ण बस स्थानकावर तासनतास ताटकळत उभे असतात. हे वेळापत्रक सुव्यवस्थित करून बस वेळेवर सुटतील याची दक्षता घेण्यात यावी.

त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्ट्यांमुळे काळबादेवीकडे जाणाऱ्या काही बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. सुट्ट्या संपत आल्या तरीही त्यातील काही फेऱ्या सुरु झाल्या असून अद्याप काही फेऱ्या बंदच आहेत. यामुळे नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि पदवीधर विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून ‘आरे’ व ‘सडये’कडे जाणाऱ्या शहरी वाहतुकीच्या बस काही काळासाठी ‘काळबादेवी’ मार्गे वळवण्यात याव्यात, जेणेकरून या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, येत्या ८ दिवसांत युवासेनेतर्फे प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी प्रसाद सावंत यांच्यासह प्रमुख संदेश नारगुडे, उपतालुकाप्रमुख रितेश लोखंडे आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!