मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात २०२९ पर्यंत प्रत्येक गावात मोबाईल नेटवर्क पोहोचवणार : आमदार प्रमोद जठार

रत्नागिरी : सन २०२९ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात बीएसएनएल किंवा इतर कंपन्यांच्या नेटवर्कचे टॉवर्स पोहोचवले जाणार असून, एकही गाव कनेक्टिव्हिटीशिवाय राहणार नाही, अशी आग्रही मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ करणे बंधनकारक असल्याने त्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी एकाच टॉवरमध्ये विविध कंपन्यांचे नेटवर्क लावण्याची परवानगी दिली असून, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आपण स्वतः काही तालुक्यांत फिरून शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी करणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले.

स्वयंपाकाच्या गॅसची समस्या पुन्हा उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बायोगॅस निर्मितीला प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५००० बायोगॅस असून, त्याप्रमाणे गावागावांतील घरांत बायोगॅस निर्मितीसाठी मोठा निधी दिला जावा, जेणेकरून घरगुती सिलिंडरसाठी होणारी शोधाशोध थांबून प्रत्येक शेतकरी बायोगॅसच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होईल, असे ते म्हणाले. रायगड किल्ला पाहिल्यानंतर थेट सिंधुदुर्गकडे वळणाऱ्या पर्यटकांसाठी मधल्या टप्प्यात पर्यटनाचा लाभ मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने कसब्यात सुमारे ४५० कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चातून ‘स्ट्रॅचू ऑफ सॅक्रिफाइस’ हे मोठे पर्यटन केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी १०० एकरपर्यंत जमीन संपादित करून ज्येष्ठ खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून नियोजन करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच शिक्षक भरतीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १५ ते २० टक्क्यांपेक्षा कमी स्थानिक शिक्षक आल्याने भविष्यात बेरोजगारीचा प्रश्न वाढू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. महसूल, आरोग्य आणि शिक्षक यांसारख्या सर्व आस्थापनांवर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील स्थानिकांच्या मुलांचा पहिला हक्क असला पाहिजे. या दोन्ही जिल्ह्यांतील मिळून सुमारे १ लाख रोजगारांपैकी ७० टक्के आरक्षण स्थानिकांना मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कायदेशीर तोडगा काढला जाणार असल्याचे जठार यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला अॅड. विलास पाटणे, प्रमोद अधटराव, ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!