मुख्य बातमी

‘सुवर्णसूर’मधून पंचदशकांची सुरेल मैफल रंगली

रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त आयोजित ‘सुवर्णसूर – पंचदशकांची सुरेल यात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व गायक-वादक हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने आठवणी, अभिमान आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात सृष्टी तांबे यांच्या ‘परब्रम्ह निष्काम तो हा’ या भक्तिगीताने झाली. त्यानंतर श्रीधर पाटणकर यांनी ‘तुझे नाम आले ओठी’ सादर करत रसिकांची मनं जिंकली. तन्वी मोरे यांनी ‘घनरानी / आज अयोध्या सजली’ आणि ‘मी पुन्हा वनांतरी’ ही गीते प्रभावीपणे सादर केली. कश्मिरा सावंत यांनी ‘कधी रे येशील तू’ आणि ‘होले होले साजना’ या गीतांनी रंगत वाढवली.

सृष्टी तांबे यांनी ‘हृदयी प्रीत जागते’ तर अभिजीत भट यांनी ‘जेव्हा तुझ्या बटांना’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ सादर करून दाद मिळवली. श्रीधर पाटणकर यांनी ‘जय शंकरा गंगाधरा’ या भक्तिगीतातून वातावरण भक्तिमय केले. आनंद पाटणकर यांनी ‘सुरत पिया की’ आणि समारोपाला ‘भैरवी’ सादर करत मैफलीची सांगता सुरेल केली.

याशिवाय कबीर मलुष्टे यांनी ‘कधी तू’ आणि ‘अभी मुझमे कही’ (ट्रॅकवर) तर ईशानी पाटणकर यांनी ‘दिल चीज क्या है’ आणि ‘बाई माझी करंगळी मोडली’ (ट्रॅकवर) सादर करून कार्यक्रमात विविधतेची भर घातली.

या कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर आणि प्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि सुवर्ण महोत्सव समन्वयक वैभव कानिटकर यांच्या हस्ते सर्व माजी विद्यार्थी गायक व वादकांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला हार्मोनियमची साथ श्रीरंग जोगळेकर, तबल्यावर प्रथमेश शहाणे व हेरंब जोगळेकर, तर व्हायोलिनवर उदय गोखले यांनी दिली. त्यांच्या समर्थ साथीने सादरीकरणांना अधिक उठाव प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी साक्षी चाळके यांनी समर्थपणे केले. ‘सुवर्णसूर’च्या या सुरेल यात्रेतून पंचदशकांचा संगीतप्रवास रसिकांसमोर उलगडत गेला आणि उपस्थितांना अविस्मरणीय अशी सांस्कृतिक मेजवानी लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!